तिथे सगळेच एका ओढीने जमले होते. नेहमीचा पुस्तक प्रकाशनाचा तो सोहळा नव्हता. त्यांच्या आवडत्या लेखकासंबंधीच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन होणार होते. सभागृह भरले होते. दारात, मागे अनेकजण उभे होते. हा लेखक होता सुहास शिरवळकर. शशिदीप प्रकाशनाच्या ‘सुहास शिरवळकर असे आणि तसे’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार आणि ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. एका अर्थाने शिरवळकरांना त्यांच्या चाहत्यांनी दिलेली मानवंदनाच आहे. मराठी साहित्य क्षेत्रात अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य असा भेद नेहमीच करण्यात आला आहे. सुहास शिरवळकर यांच्यावरही असाच अन्याय करण्यात आला. खरंतर त्यांच्या अनेक कादंबऱ्या अभिजात गटातच मोडणाऱ्या आहेत. मात्र तरीही लोकप्रिय कादंबरीकार म्हणूनच त्यांच्याकडे बघितले गेले.त्यांच्या स्मृतिग्रंथाचे रविवारी प्रकाशन झाले. हा सारा सोहळाच एका वेगळ्या वातावरणात झाला. तिथे जमलेल्या गर्दीचे सुहास शिरवळकर यांच्याशी असलेले ‘अक्षरनाते’ महत्वाचे होते. या अक्षरनात्याच्या प्रेमातूनच ही सारी मंडळी आपल्या आवडत्या लेखकाला सलाम करायला आली होती. सुहास शिरवळकर यांच्यावरील या ग्रंथात सामान्य वाचकापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून लेखन केले आहे. या समारंभातही गिरीष दाबके यांनी शिरवळकरांबरोबरच्या स्नेहबंधांना उजाळा दिला. काही किस्से सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अत्यंत महत्त्वाचं असं बोलले. ते म्हणाले. माझी आणि सुहासची जेव्हा जेव्हा भेट होई तेव्हा साहित्य सोडून अन्य विषयावर आम्ही बोलत असू, त्याने माझ्या साहित्यावर व मी त्याच्या साहित्यावर बोलायचे नाही अशी आमच्या मैत्रीतील अलिखित अट होती. कालच्या समारंभात ते म्हणाले, सुहासने ‘फलश्रुती’ या पुस्तकात म्हटले आहे की, लोकप्रिय लेखनाच्या फॉर्ममधूनच मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो.’ सुहासचे हे निवेदन खूप विचार करण्यासारखे आणि समीक्षकांनीही विचार करण्यासारखे आहे. लोकप्रिय लेखकांचीही विशिष्ठ भूमिका असते. हे सुहासने ठामपणे सांगितले. ते खूप महत्त्वाचे असल्याचे ‘हमो’नी सांगितले.द. मा. मिरासदार यांनीही शिरवळकरांच्या लेखनाचा योग्य आढावा घेतला. शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांच्या अथक प्रयत्नांमधून हा स्मृतिग्रंथ आकारला आहे. या ग्रंथात शिरवळकर यांच्यासंबंधी विशेष माहिती देणारे ६९ लेख आहेत. शिरवळकर यांच्या अफलातून अशा कादंबऱ्यांचे व त्यांच्या लेखनाचे आजही वाचकांवर जबरदस्त गारुड आहे. या पुस्तकप्रकाशनाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या नव्या पुस्तकाच्याबरोबर शशिदीपने शिरवळकरांची जी पुस्तके प्रकाशित केली आहेत त्याच्या प्रती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. अनेकांनी यातील काही प्रतींची आवर्जून खरेदी केली.सुहास शिरवळकर यांचे अचानक झालेले निधन हे सगळ्यांनाच चटका लावून जाणारे असे होते. शिरवळकरांनी आपल्या लेखनातून मोठा मित्रपरिवार गोळा केला होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व त्या निवडणुकीपासून ते नेहमी दूर राहिले पण रसिकांच्या मनावर त्यांचे अधिराज्य होते. त्या ओढीनेच सगळेजण तिथे आले होते. खरंतर शिरवळकर आज असते तर त्यांची साठी मोठय़ा उत्साहात साजरी झाली असती. पण नियतीला ते मंजूर नव्हते. अत्यंत घरगुती अनौपचारिक अशा या सोहळ्यात रसिकांची जी गर्दी होती ती शिरवळकरांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी होती. शिरवळकर यांना जाऊन सहा वर्षे झाली पण ते गेल्याच्या घटनेवर कुणाचा आजही विश्वास बसत नाही. शिरवळकरांची लेखणी वेगळीच होती. त्यामुळे त्यांना चिरंजिवित्व लाभले. कोणतीही जाहिरात न करता त्यांच्या वाचकांनी काल गर्दी केली होती. शिरवळकर यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच स्मृतिग्रंथांच्या आवृत्यावर आवृत्या नक्की काढाव्या लागतील कारण शिरवळकर यांच्याशी जोडलेल्या अक्षरनात्याचे ते शब्दरूप आहे. त्यालाही शिरवळकरांच्या अन्य पुस्तकांचे भाग्य लाभणार यात शंका नाही.
No comments:
Post a Comment