Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

इतर काही लेख


लोकसत्ता मध्ये छापून आलेला पत्रकार विनायक लिमये यांचा त्यांच्यावरील लेख :
वाचनरंग: साहित्यवार्ता : ‘सुशि’ यांच्यावर स्मृतिग्रंथवाचनसंस्कृती म्हणजे एखादे पुस्तक किंवा एखादा लेखक व त्याचे साहित्य इतक्यापुरतेच मर्यादित नसते. अनेक लेखक, वेगवेगळे साहित्य एकत्र येऊन होणारा महासागर म्हणजे वाचनसंस्कृती होय. वाचनसंस्कृती जोपासली जावी यासाठी एखाद्या लेखकाचे समग्र वाङ्मय किंवा त्या लेखकासंबंधीचा ग्रंथ महत्त्वाचा ठरत असतो. लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्यासंबंधीचा सु.शि.- सुहास शिरवळकर हा ग्रंथ पुढील महिन्यात प्रसिद्ध होत आहे. जवळजवळ ३०० हून अधिक पृष्ठांचा हा ग्रंथ सुहास शिरवळकर यांच्यासंबंधी व त्यांच्या साहित्यातील मूल्यमापन करणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर, तसेच राजन खान यांनी यामध्ये लेखन केले आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, अलका कुबल यांनी सुहास शिरवळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी यामध्ये लिहिले आहे. छायाचित्रकार दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिका अश्विनी धोंगडे, इब्राहिम अफगाण, राजेंद्र पाटणकर, आनंद यादव, शकुंतला मुळे, निरंजन घाटे या मान्यवरांनीदेखील सुहास शिरवळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संग्रहात सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांचाही लेख आहे. त्याचबरोबर सम्राट शिरवळकर यांनी सुहास शिरवळकर वडील आणि साहित्यिक अशा दोन नात्यांची असलेली जवळीक, याबद्दल लिहिले आहे. या प्रदीर्घ लेखातून आगळीच माहिती समोर येते. शिरवळकरांच्या काही मोजक्या कविता उपलब्ध आहेत. यापैकी ‘कसा मी, असा मी’ ही कविता या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. अनिल किणीकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून, शिरवळकर यांच्या साहित्याविषयी मार्मिक रसग्रहण करणारा लेखही त्यांनी लिहिला आहे. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनीदेखील शिरवळकरांसंबंधी लिहिलेल्या लेखात व. पु. काळेंचे साहित्य आणि शिरवळकरांचे साहित्य व वाचकांवर असलेली या दोघांची मोहिनी यासंबंधी लिहिले आहे. सुहास शिरवळकर यांनी विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत व स्वतविषयी लिहिलेल्या लेखांचेही संकलन या ग्रंथात आहे. एकूणच सुहास शिरवळकर यांना समजून घेण्यासाठी हा ग्रंथ खूपच महत्त्वाचा ठरेल.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेला त्यांच्यावरील त्यांच्या कवयित्री-पुतणी सुजाता महाजन यांनी लिहिलेला हा लेख :

हजारो चाहते असणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखकांपैकी एक होते सुहास शिरवळकर. ते गेल्याला आता सात वर्षे झाली. पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही. आज पुण्यात अनिल किणीकर यांनी संपादन केलेल्या 'सुहास शिरवळकर असेही-तसेही' या पुस्तकाचे प्रकाशन द. मा. मिरासदार आणि ह. मो. मराठे यांच्या उपस्थितीत होत आहे. सु.शि. या आद्याक्षरांनी वाचक शिरवळकरांचा प्रेमाने उल्लेख करत. त्या सु.शिं.च्या विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या या पुस्तकातील त्यांच्या कवयित्री-पुतणी सुजाता महाजन यांनी लिहिलेला हा लेख. ............................
देखणा 'सुकाका' घरात सगळ्यांचाच लाडका. काका आमचा लाडका होता. का? तो सतत आनंदी असायचा. जीवनरसाने भरपूर, टवटवीत असायचा. त्याच्या सहवासात दोन-पाच मिनिटे एखादी व्यक्ती आली, तरी चैतन्यानं भारून जायची. त्याचा आवाज चांगला होता. तोंडात सतत गाणी असायची. गाणी म्हणत म्हणत धावत धावत जिने चढणारा उत्साही काका मला अजून डोळ्यांसमोर दिसतोय. पूवीर् तो एका कार्यक्रमात मुकेशची गाणी म्हणायचा. पण असे कार्यक्रम आणि जागरणं, तब्येतीची नासाडी, अनेक व्यसनांच्या शक्यता ही सगळी समीकरणं आमच्या हुशार काकूच्या वेळीच लक्षात आली आणि तिने त्याला या क्षेत्रातून पाऊल मागे घ्यायला लावलं. काकूचं म्हणणं त्यानं अनकेदा मानलं. 'पुरुषांना बायकांनी अक्कल शिकवायची नसते,' अशी वृत्ती त्याच्या वागण्यात कधी दिसली नाही. हे त्याचं वेगळेपण मला आत्ता जाणवतंय. तो संघर्षप्रिय नव्हता. कुठल्याही गोष्टींवर सारासार विचार करून विवेकाने मार्ग काढायची त्याला सवय होती. माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच गट्टी होती. दोघांच्या वयात पुष्कळच अंतर होतं. पण एकूणच आमच्या घरातले लोक वयाला न जुमानणारे. बाबा आणि तो बोलताना त्यांच्या वयात अंतर आहे, असं जाणवायचं नाही. कारण कुणाला बोलण्याचं कुठलं बंधन नव्हतं. समोर लहान मुलं आहेत. हे बोलू नका, ते बोलून नका असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे आम्ही मुलंही वयापेक्षा जास्त शाहणी झालो. पुढे पुढे ते आम्हाला संभाषणात सहभागी करून घ्यायला लागले. बाकीच्या घरांमधलं वातावरण पाहिलं की, जाणवतं की, आपल्या घरात कोणतीच बंधनं नव्हती. बोलण्याची आणि कृतीचीही. दुसरी गोष्ट म्हणजे या माणसांना विशिष्ट भूमिका नव्हत्या. इतिहासाचं ओझं घेऊन ते जगत नव्हते अणि भविष्याचा ताण बाळगून वावरत नव्हते. ते साक्षात वर्तमानात जगत होते. साहित्य आणि संगीत हे अतिप्रिय विषय होते. गप्पा सगळ्या त्यासंदर्भात चालू असायच्या. जोडीला भरपूर विनोद. त्यामुळे जिवंत, खळाळत्या आनंदाच्या झऱ्यात आम्ही न्हाऊन निघत होतो. माणूस जेव्हा परिस्थितीच्या आत असतो तेव्हा त्याला माहीतच नसतं, आपण कुठल्या बेटावर आहोत. इथला प्रकाश, हवा, पाऊस, झाडं-बाहेरपेक्षा वेगळे आहेत की तसेच! आज मला जाणवते, त्या बेटावरची ताजी हवा. आनंदाचे झरे, निरागस, निर्व्याज आणि स्वतंत्र वातावरण. तुलनेने दुसऱ्या बेटांवर आता वेगवेगळ्या भूमिका आहेत. समकालीन जगाचं जास्त भान आहे. जरूरीपेक्षा जास्तच गांभीर्य आहे. काकाच्या लेखनात एक मूल्यसमरणी नकळत होतीच. बालवयात केलेल्या वाचनाचे, ऐकलेल्या कीर्तनांचे, पुराणकथांचे, रामायण-महाभारताचे संस्कार होते. बऱ्या-वाईटाचा विवेक दिसून यायचाच. चेष्टा, मस्करी, विनोद हे त्याच्या जगण्याचा आणि लेखनाचाही अविभाज्य भाग होते. कधी कधी चेष्टा करताना, भाषिक विनोदापोटी कुणाच्या वर्मावर बोट ठेवलं गेलं असेल किंवा विनोदविषय बनलेल्या गोष्टीतलं कारुण्य न दिसल्यानं विनोद थोडा क्रूर बनला असेल. पण ते केवळ विनोदाच्या हव्यासपोटी. त्याच्या वृत्तीत क्रौर्य अजिबात नव्हतं. उलट तो अतिशय संवेनदशील होता. दुसऱ्या माणसाला मदतीची गरज असेल आणि तो करू शकल असेल तर वाटेल तेवढी मदत करायला त्याने कधीच मागे-पुढे पाहिलं नाही. तो स्वत:चा मूल्यवान वेळ द्यायचा, स्वत:च्या ओळखींचा उपयोग करून गरजू माणसाला मदत करायचा. वाचकांनी जसं त्याच्यावर भरपूर प्रेम केलं, तसं त्यानेही वाचकांवर भरपूर प्रेम केलं. त्याच्या कादंबऱ्या वाचून त्याच्यावर प्रेम करणारे उदंड वाचक त्याला मिळाले. ते त्याला मोठमोठी पत्रं पाठवायचे. तो त्या सर्वांचा आदर ठेवून उत्तरं लिहायचा. मग वाचक भेटीची इच्छा व्यक्त करायचे. काका सर्वांना भेटायचा, वेळ द्यायचा, कुणालाही त्याने टाळलं नाही. वाचक स्वत:च्या कहाण्या सांगायचे, रडायचे, तो अत्यंत मन:पूर्वक त्यांच्याशी बोलायचा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचा. कधी कधी तर त्याला आईवडील-मुलगा, पती-पत्नी, भावंडं अशा नात्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका देखील निभवावी लागायची. सुकाका हे चालतेबोलते समुपदेशन केंदच होतं. मी लिहिणारी म्हणून काकाची विशेष आवडती. त्याचं पुष्कळसं लेखन मी लिहिल्या लिहिल्या वाचलंय. तो लिहितानाच इतकं काळजीपूर्वक लिहायचा की पुन्हा लिहावं लागू नयं. अतिशय सुंदर हस्ताक्षर, मांडणी उत्कृष्ट, त्यामुळे हस्तलिखित वाचायला मजा यायची. माझ्याशी तो साहित्य क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचा. बारीकसारीक तक्रारीही करायचा. पण आत्ता एक लक्षात येतंय. त्याच्या स्वभावात खासगीपण नव्हतं. म्हणजे माझ्याशी जितकं मनमोकळं बोलेल तितकाच तो अक्षरसुद्धा न वाचणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी, एखाद्या दुकानदाराशी, कामवाल्या बाईशी, वाचकांशी, कुणाशीही मोकळेपणाने बोलू शकायचा. विषय भले वेगळा असेल. त्याची शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्याला वाटत राहायचं. काळाच्या प्रवाहात प्रत्येकजण अस्तित्वासह एक जागा व्यापून असतो. तो दुसऱ्या कुणाच्या जागी असू शकत नाही आणि दुसरा त्याच्या जागी. पण ही जाण सर्वांच्या भाग्यात नसते. त्यामुळे लोक तुलना करतात. याचं लेखन असंय, त्यांचं तसंय. ठीक आहे. त्यांनी तेच करावं; पण हे काकाला कधीच उमगलं नाही. तो दुखावला जात राहिला. पुन्हापुन्हा. वास्तविक त्याच्यावर हेटाळणीने लिहिणाऱ्या समीक्षकांना जर विचारलं की तुम्ही आधी वाचलंय का? तर बहुतेकांचं उत्तर 'नाही' असायचं. काकाला टीकेपेक्षाही न वाचता केली गेलेली टीका जास्त दुखावून जायची. त्याच्या लेखनाला दहा वषेर् पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. असा कार्यक्रम सहसा कुणी करीत नाही. त्या दिवशी त्याचे सर्व प्रकाशक, लेखकमित्र, वाचक, पत्रकार, चित्रकार असे अनेक हितचिंतक उपस्थित होते. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या सवेर्क्षणात वाचकप्रिय लेखक म्हणून काकाला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालं होतं. त्याला मोठे मानसन्मान मिळाले नसतील. पण वाचकांच्या अखंड प्रेमाचा झरा त्याच्या आयुष्यात शेवटपर्यंत झुळझुळत राहिला. तो कधीच आटला नाही. अजूनही येणाऱ्या पिढ्या त्याचं लेखन वाचतायत. त्याच्या लेखनावर प्रेम करतायत. त्याच्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघतायत. त्याच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट काढता येऊ शकतात. भविष्यात हेही घडू शकेल. तेव्हा कदाचित इतिहासाला त्याची दखल घ्यावीच लागेल


रविप्रकाश कुलकर्णी यांचा सामना या वृत्तपत्रात छापून आलेला लेख
सुहास शिरवळकर हा एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.
असा हा लेखक आकस्मिकपणे ११ जुलै २००३ रोजी हृदयविकाराचा धक्का बसून गेला. पण माणूस गेला तरी त्याची आठवण राहते. किंबहुना माणस आठवणीतच जिवंत राहतात. सुहास शिरवळकर यांच्या बाबतीत असंच काहीस झालं. सुहासचे चाहते, मित्र, आप्त, समकालीन सगळेच त्यांची आठवण काढत राहिले.
या अशा आठवाणीचाच संग्रह 'सुहास शिरवळकर - असे आणि तसे' नावाने अनिल किणीकर यांनी संपादित केला आणि शाशिदीप प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.
राजन खान यांनी नेमकेपणान म्हटलं आहे - 'सुहास शिरवळकरांची न माझी भेट हि पहिल्यांदा, अर्थातच त्यांच्या पुस्तकातूनच झाली. माझ्या पिढीतले जे वाचणारे लोक होते. त्यांच्या वाचनाच्या आयुष्यात सुहास शिरवळकर हे नाव येण हि गोष्ट अगदी अपरिहार्यच होती. बाबुराव अर्नाळकर, एस.एम. काशीकर यांच्या पुस्तकांनी मला वाचनात अडकवलं. वाचन जगण्याचा अविभाज्य भाग झाला. त्यांच्या नंतरचा वाचनाचा जो टप्पा होता, त्यात बाबा कदम, सुहास शिरवळकर हि नावं होती. त्यात सुहास शिरवळकरांनी जास्त जखडून ठेवलं. त्यांच्या विषयामध्ये विविधता होती. भाषेच्या विविध खेळी होत्या. त्यांच्या लिहित्या विषयाला वेगवानपणाही असायचा. भाषेलाही असायचा. वाचनाऱ्याला विषय आणि भाषेच्या प्रवाहात नेण्याची ताकद असायची.'
शिरवळकरांच्या रहस्यकथा म्हणजे अर्थातच त्यांचे नायक फिरोज इराणी, दारा बुलंद, मंदार पटवर्धन, बॅ. अमर विश्वास हे भलतेच लोकप्रिय होते - आजही आहेत. पण एका क्षणी त्यांनी रहस्यकथेला रामराम ठोकला आणि ते सामाजिक कादंबरीकडे वळले. तिथेही त्यांनी तेवढीच लोकप्रियता मिळवली. मात्र या लोकप्रिय लेखकाला साहित्यिक मान्यता मात्र मिळत नव्हती. तसा हा तिढा नेहमीचाच आहे. त्याचे पडसाद या लेखात दिसतात. असे असताना मग या अशा लेखकांना साहित्य प्रांतात कुठे बसवायचं ? त्याबाबत इब्राहीम अफगाण यांनी म्हटलं आहे. 'आपले साहित्यविश्व हे एका इमारतीसारखे मानले तर अभिजात वाड्मय कळस आणि रहस्यकथा व अन्य काल्पनिक वाड्मय पाया आहे. पाया आणि कळसाच्या मध्ये काही सोपान असतात. ते सोपान म्हणजे शिरवळकरांसारखे लेखक. या सोपानामुळेच माझ्यासारखे असंख्य वाचक, लेखक, अभिजात वाड्मयापर्यंत पोहोचले. त्यांना विसरून कसे चालेल ?'
या संग्रहातील विलासदत्त राऊत यांचा लेख अप्रतिम असाच आहे. त्या काळच्या रहस्यकथा युगातला हा एक घटक. राऊत हे सुहासच्या पहिल्या लेखनापासूनचे साक्षीदार. सुहासच्या पहिल्या कथेचं बारस 'गोल्ड हेवनचे गूढ' हे राऊत यांनीच केलं होत आणि जत्रा मध्ये छापण्यास त्यांनीच मदत केली होती. याशिवाय काही खास अंतरंगातली गुपित राऊतांनी उघड केली आहेत. उदा. सुहासचं लेखन हिरव्या शाईत असायचं ( भेलकाचे बेहेरे हिरव्या शाईतच लिहायचे ) हे कसं झालं ? राऊत सांगतात,' माझ्या अंकशास्र व रंगशास्रानुसार काळी शाई बंद करून हिरवी शाई वापरण्याचा सल्ला फलद्रूप झाला.'
या पुस्तकात खुद्द सुहास शिरवळकरांचा एकूणच लोकप्रिय लेखनाबाबतचा दृष्टीकोन त्यांचा आणि इतरांचा, याबाबत प्रदीर्घ लेख आहे. लेखकाचा सल, ठसठस त्यात स्पष्ट उमटली आहे.
आणि हो, सुहास शिरवळकर, दुनियादारी कादंबरी याशिवाय सुशिमहात्म्य पूर्ण होऊच शकत नाही. त्याचे साद - पडसाद या ग्रंथात आहेतच. थोडक्यात सुहास शिरवळकरांबद्दल कुतूहल जाग करणारं आणि त्याबद्दल अधिक काही सांगणार हे पुस्तक आहे.

सुशि’ यांच्या निधनाची महाराष्ट्र टाईम्सने छापलेली बातमी :

मुंबई : रहस्यमय कादंबऱ्यांनी मराठी वाचकांवर दीर्घकाळ भुरळ घातलेले ज्येष्ठ लेखक सुहास शिरवळकर यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता तासभर त्यांचे पार्थिव महाराष्ट्र साहित्य परिषदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरवळकर यांच्या बहिणीचे अलीकडेच निधन झाले होते. तिच्या दशक्रिया विधीसाठी ते शनिवारी पुण्याहून कोकणातील त्यांच्या गावी गेले होते. तेथून ते मंगळवारी अंधेरी येथील त्यांच्या भाचीकडे आले. हिंदी चित्रपटासाठी कथालेखनाचे काम अलीकडेच त्यांनी हाती घेतले होते. त्याबाबत त्यांच्या बैठका सुरू होत्या. त्या आटोपून ते शनिवारी पुण्याला परतणार होते. मात्र सकाळीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना वांदे नसिर्ंग होममध्ये हलविण्यात आले होतेे. लेखन हेच उपजीविकेचे साधन असलेल्या शिरवळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४९ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला तुफान लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. सुमारे १५० रहस्यमय कादंबऱ्या आणि कोवळिक , वास्तविक , वेशीपलीकडे , यांसारख्या ७१ लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. याशिवाय ११ कथासंग्रह , पाच नभोनाट्ये आणि विविध वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखनही केले. 


सुशि’ यांच्यावर निधनाची एका इंग्रजी वर्तमानपत्रातने छापलेली बातमी : 

Noted writer Suhas Shirwalkar no more Express News Service
Pune, July 11: NOVELIST Suhash Shirwalkar died of cardiac arrest at a private hospital in Mumbai this afternoon. He was 54 and is survived by his wife and two sons. Known for his detective-thrillers, Shirwalkar had also authored Roopmati, a novel with a historical background, besides short stories, one-act plays and radio plays. Devaki, a Marathi movie based on one of his short-stories, recently won a State award for best story. The writer, who was on a trip to Mumbai, complained of chest pains in the afternoon. He was immediately taken to a hospital where he died while undergoing treatment, family sources said. Shirwalkar’s mortal remains will be kept at the Maharashtra Sahitya Parishad Hall at Tilak Road on Saturday morning to enable literature-lovers to pay their last respects. Final rites will be performed at Vaikunth crematory, thereafter. Duniyadari, a novel tracing the world of college-goers, was regarded a milestone in Shirwalkar’s writings. The creator of characters like Barrister Amar Vishwas, Firoz and Dara Buland in his popular detective thrillers, Shirwalkar also managed to handle topics like medicine and astrology in great detail in his writings. His newspaper columns including Ityadi-Ityadi, Vartulatim Mansa and Phalashruti were well-received by readers.

3 comments:

  1. Can anybody tell me the book names of Amar Vishwas, Dara Buland , Firoz Irani & Mandar Patwardhan. I wat to buy all the books

    ReplyDelete
  2. मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

    दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

    अमर विश्वास कथा - थर्राट, चेलेंज, कायद्याचे हात, सराईत, मर्डर हाऊस, कोल्ड ब्लड , ऑर्डर ऑर्डर, टेरिफिक, इलेवंथ अवर, सायलेन्स प्लीज, नॉट गिल्टी, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, स्टार हन्टर्स, सराईत

    फिरोज इराणी कथा : सहज, ट्रेलर गर्ल, गाफील, डेड शॉट, हव्यास, पांचाली, ब्लाक कोब्रा, जबरदस्त, सॉलीड, शैली शैली, उस्ताद

    मुक्त / विस्मय कथा : हेलो हेलो, गुणगुण, माध्यम, जाणीव, किलक्रेझी, मरणोतर, निराकार, मास्टर प्लॅन, जीवघेणा, सैतानघर, अनुभव, स्टुपिड, ज्वाला, मातम, अट्टल, प्राक्तन, मंत्रजागर, ज्वेल थीफ

    ReplyDelete
    Replies
    1. How to get online or offline books of Sushi pertcular for Dara Buland Series

      Delete