Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

झलक सु.शिं.च्या पुस्तकांची

'दुनियादारी’
… हेच बदल म्हणजे जीवन असेल तर कशाकरता जगायचं ते ? पतंग आपला फाटतोय…गोते खातोय…त्याला खाली हापसायचा. ठिगळं लावून पुन्हा उडवायचा. मध्येच मांजा तुटला कि सारी पोरं पतंग धरायला ‘है॓sss’ करुन धावतात. जिवाच्या आकांतानं आपणही त्यांच्या बरोबर दमबाजी करीत पळायचं. ‘एssसो ss ड…सोड!भैं…द ! हात तोडून टाकीन !’ म्हणत पतंगपुन्हा पकडायचा. गरम छातीनं, पेटके आलेल्या पोटयांनी परत जागेवर यायचं-तुटलेल्या मांज्याला पक्क्या गाठीमारायच्या…पुन्हा पतंग आपला आकाशात ! का रे बाबा एवढा सोस ? तर फाटका,ठिगळं लावलेला…कसाही का असेना …आमचा पतंगही आकाशात उडतो आहे !…देख ! तिच्यायला ! त्यापेक्षा ठिगळांसकट, गाठींच्या मांज्या-सकट, त्या पतंगाची जाळून राख करुन, द्या चिमूट-चिमूटसगळ्या धावणायांच्या हातात !…खा प्रसाद म्हणून. नाही तर,लावा कपाळाला अन्‌ नाचा…आकाशात फडफडायला दुसया एखाद्या डौलदार पतंगाला जागा झाली म्हणून !


'सॉरी सर’ - 
‘चिअर्स-!’ तिनं ग्लास ओठाला लावला. वास घेऊन पुन्हा बाजूला केला. त्याच्या आशा ठिसूळल्या. ‘का, काय झालं ?’ ‘डो’न्ट वरी. मी हा ग्लास संपवणार आहे मिस्टर टंडन.’ ती गंभीरपणे म्हणाली,’ कारण, तुम्ही मला इथे कशाकरता बोलावलंय्‌ याची मला पूर्ण कल्पना आहे ! जे घडेल, ते बेहोशीत घडून जावं…शुद्धीवर आल्यावर त्याची जाणीवही राहू नये, म्हणून तरी मला हा ग्लास संपवलाच पाहिजे. पण शुद्धीत असताना मी काय सांगते ऐकून ठेवा. माझ्या किरणला आज नोकरीची गरज नसती तर…थोड्या वेळानं जो देह तुम्ही विवस्त्र पाहणार आहात मनसोक्त उपभोगणार आहात…त्या देहाचं नखसुद्धा तुमच्या दृष्टीस पडलं नसतं ! पण माझ्या दुर्दैवानं, दान तुमच्या बाजूचं आहे. त्याला नोकरीची नितान्त आवश्यकता आहे. म्हणूनच आजच्या रात्रीपुरता हा देह तुमच्या स्वाधीन करणार आहे !’ असं म्हणून तिनं ग्लास तोंडाला लावला. गटागट पिऊन टाकला तो आवाक्‌ ! त्याच्या हातातला ग्लास तसाच. ‘घ्या मिस्टर… घ्या ! अपराधाची बोचणी लागून मजा किरकिरा होणार नाही म्हणजे !’ त्यानं निमूटपणे ग्लास उचलला. संपवला.


'न्याय-अन्याय’-  
तपासाची सूत्रं अशोक फडकरच्या हाती जायला नको होती ! डिपार्टमेंटचा हा एक माणूस टेरर आहे. नसलेलं सूत निर्माण करून, त्या वरुन स्वर्ग गाठण्यात त्याचा हात कोण धरणार नाही ! आणि पोलिस आहे का कोण हो ! साला औषधाला पैसा खाईल तर शपथ ! -हे फार वाईट ! म्हणजे, हा या ना त्या प्रकारे योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला,तर…! दिवाभीतीचं आयुष्य-या शब्दाचा अर्थ मला तेव्हा खऱ्या अर्थाने कळला !  दारावरची बेल वाजली की, माझे हात-पाय गळायचे ! कामाच्या ठिकाणी कोणी हाक मारली की, खपकन्‌ हृदय बंद पडायचं ! माझं नशीबच थोर, म्हणून या काळात माझी न्‌ फडकरची कुठे समोरासमोर गाठ पडली नाही ! तरंगिणी गेली…ऐन तारुण्यात गेली….अशा प्रकारे गेली…तिच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. सगळं मला मान्य होतं. झाल्या प्रकाराबद्दल मला दु:ख वाटत होतं. मन:पूर्वक पश्चातापही होत होता. पण असा विचार करा - मी काही कोणी सराईत खूनी नाही. सायकिक तर त्याहून नाही. किंबहुना, गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल मला स्वत:लाच चीड आहे. मग, मी न सापडल्याने, एकमोठा गुन्हेगार मोकळा रहातो, अशातला भाग नाही, हे तुम्हीही मान्य कराल. कसं घडलंते मी तुम्हाला हातचं काहीही न राखता सांगितलंच आहे. तरंगिणी तर गेली. आता, मी माझे प्राण वाचवायला प्रयत्न केला तर, त्यात चूक काय आहे ? हा मुद्दा लक्षात येताच, माझं डोकं विचार करायला लागलं. फडकर कसा तपास करतो- त्याला काय मिळतं… नुसतं पाहात बसून चालणार नाहीये ! पुराव्या अभावी पोलिसांनी केस फाईल केली तरी डोक्यावर आयुष्यभर टांगती तलवार राहिल ! त्यापेक्षा, आपणच फडकरला आपल्या दृष्टीनं सुरक्षित अशी शोधाची दिशा दिली पाहिजे. खटला निकाली झाला पाहिजे ! दोन दिवस मी त्याच विचारात होतो. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या विचारांना दिशा मिळाली. तो-एल्‌.आय्‌.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर! काही इलाज नाही ! तो या प्रकरणा संदर्भात तरी इनोसन्ट आहे, हे मला माहित आहे. पण, माझी मान निश्चित्पणे वाचवायची असेल तर, त्याची पक्की अडकणं आवश्यक आहे ! निर्णय घेताना मला वाईट वाटलं खरं; पण शेवटी…न्याय-अन्याय…सगळ्या टर्मस्‌ सापेक्षच की !


'दुनियादारी' –  
तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे रीन जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नाकारू शकत नाही पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही ! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते ! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे ! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर होउ नये !







क्षितिज’ –  
माफ करा विश्वासदा ! तुम्ही दिलेलं हे बक्षीस मी आजपर्यंत अभिमानाने जपलं कसेही प्रसंग आले तरी ते काधून टाकण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही. पण…आज मी ही सिगारेट-केस लायटरसह विकू इच्छितो ! सारं जग-विश्वाचे सारे मानवी व्यवहार भाकरीच्या एका चतकोरात सामावतात, हेआज मला पटलं. तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला माफ कराल ! तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलेली ही छोटीशी भेट विश्वासदा, या भेटीच्या रुपानं एकदा सारं विश्व मुठीत बंदिस्त झालं होतं. सारी इन्डस्ट्री तेव्हा पायाशी असल्यासारखं वाटलं होतं. भविष्याच्या स्वच्छ निळ्याभोर आकाशात एक सप्तरंगी क्षितिज-रेषा दृष्टीपथातआली होती. पौर्णिमेचा उगवता चंद्र असा हात लांब करुन हातात घेण्याइतका सहजप्राप्य वाटावा, तशी ही क्षितिज-रेषा चार पावलांवर भासत होती. या रंगीत क्षितिजावर एक दिमाखदार, टप्पोरा तारा स्वयंतेजाने तळपत होता. कीर्ती…पैसा…मानसन्मान…असे त्याचे कितीतरी पैलू नजरेच्या टप्प्यात होते. वाटलं होतं, या क्षितिज-रेषेपाशी लवकरच आपल्याला पोचायचं आहे. मग तो उगवता तारा हळूच स्वत:हून खुडला जाईल. आपल्या माथ्यावर विराजमान होईल. आता मला कळलं आहे विश्वासदा; तुम्हाला कळलं आहे का ? कोणत्याही अतृप्त कलावंताची अधाशी नजर अशाच एका क्षितिज-रेषेवर खिळलेली असते. या रेषेवर एक तारा असतो .या तार्‍याचं प्रतिनिधीक रूप म्हणजेच कलेतला आपला आदर्श. या आदर्शांपर्यंत पोहोचणं, हेच आपल्या कला-जीवनाचं ध्येय. सांगता. हा तारा हासिल करण्यासाठीच कलाकार तन-मन-प्राण पणाला लावून आयुष्यभर झिजतो, कष्ट घेतो. पावलाला शेकडों जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितिज-रेषेकडे सरकत राहातो. आणि…क्षितिज हाती लागत नाही; ताऱ्याची जागा सापडते, तर ताराही पुढे सरकलेला ! किती चमत्कारीक आहे हे विश्वासदा ! या ताऱ्याची नजरही दूर कुठेतरी स्थिरावलेली असते. त्याच्या नजरेसमोरही, त्याच्यापुरती दिसणारी अशी एक क्षितिज-रेषा असते. तिथेही एक दैदिप्यमान तारा लखलखतअसतो. आणि ती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो. दु:खी असतो. कष्टी असतो. उदास असतो. प्रत्येक कलाकाराचं क्षितिज असं त्याच्या दृष्टीपथात; हाती मात्र येत नाही!


'सूत्रबद्ध्' -  
एकदा संबंध येण्यापूर्वी, तो येऊ न देणं माणसाच्या हातात असतं. एकदा संबंध आला की, 'आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ ! हेही चालत नाही ! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच !’








'काळंबेरं' -  
आत…आत, जंगल-गाभ्यात खोल…खोल शिरत…अखेर मी त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो ! वृक्षतोड करुन, सोयीनं तयार करुन घेतलेलं मैदान. त्यात, आपली कबर कोणती, ते मृतालाही आता ठामपणे सांगता येणार नाही, इतक्या त्या मेलेल्या…पडझड झालेल्या…रंगावर धुळीचे लोट बसलेल्या…स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या कबरी…आणि, एक चबुतरा ! तो मात्र तुकतुकीत,स्वच्छ !कबरी तशा फारशा नव्हत्या.'किती आहेत ?’ असं मनाशी विचारत, मी पुढे येताना त्या मोजूनही टाकल्या !एक…दोन…ती चौथी…सहा…सात…दहा! दहा! हा आकडा कबरींच्या संदर्भात मला परिचयाचा वाटला. जणू, कबरी म्हटलं की, त्या एका जागी दह-दहाच्या बंचमधेच असणार ! मग, अगदी अचानकपणे, या ’दहा’चा संदर्भ लागला; आणि मी नखशिखान्त शहारलो. दहा! अली-बंधू अकराजण होते. पैकी, सादिक एकटा जिवंत आहे! दहा भावांच्या दहा कबरी! आणि… हा चबुतरा राखीव-अकराव्या कबरीसाठी ? या क्षणी तो संपूर्ण रिकामा होता.


'कोवळीक' -  
"एखाद्या युवतीबद्दल आकर्षण वाटण, तिच्या प्रेमात झुगारून द्यावस वाटण, हा तरुण मनाचा स्थ्यायीभाव आहे. त्याबद्दल मी कोणत्याच तरुणाला, अगर तरुणीला दोष देणार नाही ! पण ज्याला प्रेम आणि वासना यातल्या सीमारेषा वेळीच ओळखता येतात आणि आयुष्याला कीड लावणारा मोह टाळता येतो, त्याच्यापुरताच हा स्थायीभाव निकोप आहे. सुंदर आहे. निकोप प्रेमाच्या चौकटीत चोरटे स्पर्श बसतात, माफक प्रमाणातील थापाथापी बसू शकते, हिंडणे - फिरणे बसू शकत आणि क्क़्वचित कधीतरी एखादी पायरी ओलांडली तर तेही बसवता येत ! पण या चौकटीला वासनेची कीड लागली तर ही निकोप चौकट सडत - किडत गळून पडते. बंधनं उखडली जातात. आणि लक्षात ठेव सत्यशील, जे- जे अनिर्बंध आहे, बेफाम आहे, मोही आहे ; ते - ते सर्वनाशच्या खाईकडे नेणारं आहे. तुझ्या हातून तसलं काही होणार नाही. हा माझा विश्वास आहे. " 



'कोवळीक'  

"मोहाचा क्षण .... जो भल्या - भल्यांना जिंकता येत नाही - ह्या कोवळ्या पोरानं जिंकला होता ! विश्वामित्रांची साठ हजार वर्षांची तपश्चर्या सत्यशीलन एका क्षणात साधली होती ! "  
'कोवळीक' 

"सत्यशील, माणसाला नेहमी वाटत असतं, कि आपल्या वाट्याला जे दुख आलं, जे अनुभव आपण घेतले, ते जगापेक्षा निराळे आहेत ! असं वाटत , कारण आपल्या दुखात गुरफटून घेऊन मनुष्य उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहतच नाही ! प्रत्येक दुखाच्या आपापल्या कक्षा असतात, त्या त्या कक्षांमध्ये असेपर्यंत दुख पर्वतासारखी प्रचंड वाटतात. त्या दुखांमध्ये गुरफटून घेता डोळे आणि मन उघड ठेवून जगाकडे पाहिलं , तर लक्षात येत आपण खूप सुखी आहोत, असं वाटण्याएवढी दुख लोक अनुभवत असतात !"
 
काही लाईन्स दुनियादारी मधून :
"खूप दारू पिऊन बेहोष झालेला - म्हणून नकळत बाईला भररस्त्यावर समोरून भिडणारा माणूस पशू ;
का दारू  पिता - म्हणून शुद्धीवर असलेलात्याला इतक्या निर्दयपणे मारणारा थवा पशू ?"
स्वतःचा सख्खा  मुलगा असा हाता-तोंडाशी आला असताना आई - वडिलांना भावी जीवन अंधकारमय वाटणं - यासारखी जगात दुसरी नालायक शोकांतिका नाही !

"परिणामांची पर्वा  करता केलं जातम्हणून तर प्रेमाला आंधळ म्हणतात ना ! नापास झालेल्या पोराला तू विचारशील - नापास व्हायचं होततर वर्षाची फी वाया घालवली कशाला ?.....काय उत्तर देऊ  शकेल तो ?"

7 comments:

  1. Replies
    1. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !

      Delete
  2. तसा माझा साहित्याशी संबंध म्हणावा तितका विस्तारित नसल्यामुळे माझ्या पिढीला पुढे जाऊन सुशिंच्या साहित्याचा जो काही आनंद उपभोगायला मिळेल त्यासाठी माझ्यामते बरचसं श्रेय हे संजय जाधवांना नक्कीच दिलं पाहिजे.
    कारण स्पष्टच आहे, संजय जाधवांच्या दुनियादारीमुळे सुशिंच्या दुनियादारीची गोड तोंडओळख झाली , त्यानंतर खास त्यांच्यासाठीच वाहून घेतलेला तुमचा ब्लॉग सापडला. आणि तुम्ही दिलेल्या या पुस्तकांच्या तोंडओळखीने खरंच मन चाळवल गेलय. वरील उतार्यांवरून लक्षात येत की नक्कीच तुम्हाला सुशिवेड लागलाय आणि तितकच ते नव्याने वाचणार्याला देखील लागेल .

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !

      Delete
  3. नमस्कार अक्षयजी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुम्हालाही सुशि वेड लागावे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !

    ReplyDelete
  4. i want name of amar vishwas novels

    ReplyDelete
    Replies
    1. मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

      दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

      अमर विश्वास कथा - थर्राट, चेलेंज, कायद्याचे हात, सराईत, मर्डर हाऊस, कोल्ड ब्लड , ऑर्डर ऑर्डर, टेरिफिक, इलेवंथ अवर, सायलेन्स प्लीज, नॉट गिल्टी, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, स्टार हन्टर्स, सराईत

      फिरोज इराणी कथा : सहज, ट्रेलर गर्ल, गाफील, डेड शॉट, हव्यास, पांचाली, ब्लाक कोब्रा, जबरदस्त, सॉलीड, शैली शैली, उस्ताद

      मुक्त / विस्मय कथा : हेलो हेलो, गुणगुण, माध्यम, जाणीव, किलक्रेझी, मरणोतर, निराकार, मास्टर प्लॅन, जीवघेणा, सैतानघर, अनुभव, स्टुपिड, ज्वाला, मातम, अट्टल, प्राक्तन, मंत्रजागर, ज्वेल थीफ

      Delete