Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

Friday, May 14, 2010


सुहास शिरवळकर 
  (१५ नोवे १९४८ - ११ जुलै, २००३)
 मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक

मी सातवीत असल्यापासून कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. वडील गावामध्ये असलेल्या लायब्ररीमधून पुस्तके घेऊन येत. ती पुस्तके मीही वाचीत असे. त्यावेळी साहित्य वगैरे या गोष्टी कळत नव्हत्या, फक्त चांगल्या कथा आहेत, वाचायला आवडतं म्हणून वाचायचा नंतर जवळजवळ ११ वी पर्यंत वेगवेगळी पुस्तके वाचतच होतो. त्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत याकडे कधीच लक्ष दिले नाही. खरं म्हणजे साहित्य, कथा, कादंबऱ्या, समीक्षक, समीक्षण हि समजच मला तोपर्यंत नव्हती. नंतर नंतर अभ्यासामुळे (१२ वी नंतर मी संगणक अभ्यासासाठी प्रवेश घेतलेला ) पुस्तकांशी संबंध जवळजवळ संपूनच गेला. काही वर्षांनी मी नोकरीसाठी मुंबईला आलो. नोकरी मिळाल्यावर आई-वडील देखील मुंबईला आले. तोपर्यंत माझी वाचण्याची सवय बंदच झालेली होती. पण वडील मात्र मुंबईला आल्यावर परत लायब्ररीमध्ये जाऊ लागले. परत वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके घरात येऊ लागली. त्यामुळे माझ्यातील वाचक परत जागा झाला. तोपर्यंत मला पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज ( वि.वा.शिरवाडकर ),राम गणेश गडकरी, आनंद यादव हेच लेखक माहित होते, तेही कारण या लेखकांचे बरेच धडे ( त्यांच्या कथा ) आम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत पाठ्यपुस्तकांत होते म्हणून. वाचनाची गोडी वडिलांमुळे लागली.

पुन्हा एकदा मी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला कथा, कादंबरी, ललित लेखन म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला. वेगवेगळे लेखक आणि त्यांची असलेली लिखाणशैली याचा शोध मला लागला. मग कुठला लेखक किती भारी लिहितो हे पाहण्यातच माझा वेळ जाऊ लागला. अशातच 'दुनियादारी' हे पुस्तक माझ्या वाचनात आले. बाप रे ! दुनियादारी वाचल्यावर असा काही अनुभव आला की शब्दांत सांगणे केवळ अशक्य. 'दुनियादारी' वाचल्यानंतर फक्त एकच नाव माझ्या मेंदूत कायमसाठी बसले गेले ते म्हणजे 'सुशि' अर्थात सुहास शिरवळकर. तेव्हापासून एकाच ध्यास लागला सुशि आणि त्यांची पुस्तके बास ! झपाटल्यासारखी त्यांच्या सर्व कथा कादंबऱ्या वाचून काढल्या, नव्हे पारायणे केली. मंदार , फिरोज , अमर आणि दारा हि त्यांची मानसपुत्र मनात घर करून राहिली तर दुनियादारी , कोवळीक, निदान , हमखास , मुक्ती , सॉरी सर , दास्तान, पहाटवारा अशा अनेक अप्रतिम कादंबऱ्यानी त्यांच्या लेखणीतून जन्म घेतला. त्यांनी आपल्या कादंबऱ्यामध्ये पात्रे, त्यांची नावे , स्थळांची नावे एवढी चपखल वापरली आहेत कि जणू ती त्या कादंबरीसाठीच जन्माला आलेली असावीत. बरं विषयही असे वेगवेगळे की माणूस कल्पनाच करू शकत नाही. त्यांनी एवढ्या रहस्यकथा लिहिल्या पण सगळ्याच आपल्याजागी आपलं वेगळपण सांगणाऱ्या. एवढ्या रहस्यकथा लिहूनही कुठेही त्यांच्यात सारखेपणा नाही किंवा कुठेही वाचकाला कथा भरकटल्यासारखी वाटत नाही. त्यांनी आपल्या कथांमध्ये प्रसंगानुरूप व सहजतेने वापरलेले विनोद वाचकांना खळखळून हसवतात, जणू ते मजेदार दृश्यच वाचकांच्या डोळ्यासमोर तरळते. त्यांच्या पुस्तकांची जबरदस्त मोहिनी त्यांच्या चाहत्यांवर होती. त्यांचे पुस्तक एकदा वाचायला हातात घेतले कि वाचक पुस्तक बंदच करू शकत नाही., एवढी जबरदस्त लिखाणशैली त्यांची होती. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लिखाणात होती. शब्दांची अचूक मांडणी आणि वाक्यात मोजके व चपखल बसणारे शब्द ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये. त्यांचे नवीन पुस्तक वाचायला घेतले कि त्याची अर्पणपत्रिका काय असेल याकडे लक्ष लागलेले असायचे, कारण त्यांच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांच्या अर्पणपत्रिका सुंदर असायच्या. प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या अर्पणपत्रिका अगदी अप्रतिम आहेत.

विषयांच सांगायच झाल तर किती वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिखाण केले. मग ती 'निदान' सारखी वैद्यकीय क्षेत्रावरील कादंबरी असो वा 'हमखास' सारखी शिक्षण क्षेत्रातील क्लास संस्कृतीवरील कादंबरी असो, सगळ्याच अप्रतिम आहेत. त्यांच्या कादंबरीतील नायिका त्यांनी इतक्या अप्रतिमपणे रेखाटल्या हे 'पहाटवारातील मृणालिनी' वाचल्यावर लक्षात येतं. मानवी जीवन व त्याच्या स्वभावाच सूक्ष्म निरीक्षण या सगळ्यांचा किती गाढ अभ्यास त्यांचा होता हे त्यांच्या प्रत्येक कादंबरीतून दिसून येते. 'काटेरी' मधला 'सुरेख राजदत्त' त्यातलच एक उदाहरण. एका अपंग मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय, त्यातून होणारी त्याच्या मनाची चलबिचल, भावनांचा कल्लोळ हे सगळं इतक्या अप्रतिमपणे रेखाटलं आहे की माणूस वाचताना अक्षरशः थक्क होतो. साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. असा एकही प्रकार नाही ज्यात त्यांनी लिखाण केलं नाही. रूपमती, जमीन - आसमान सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. रहस्यकथा, कादंबरी, सदरलेखन, बालवाड्मय, नभोनाट्य / एकांकिका याचबरोबर कविता देखील लिहिल्या.

त्याच्यानंतर मी पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, रत्नाकर मतकरी, रणजीत देसाई, वि.स. खांडेकर, विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे, जी.ए.कुलकर्णी, राम गणेश गडकरी हे सर्व लेखक वाचले, परत परत वाचले. पण तरीही सुशिंच्या रहस्यकथा आणि कादंबऱ्या तिथेच होत्या आणि तितक्याच श्रेष्ठ होत्या. मी तर म्हणेल की सुशि सारखा लेखक होणे नाही. त्यांची कादंबरी वाचून पूर्ण केल्यावर होणारा आनंद कादंबरी संपवल्यावर कादंबरीच्या शेवटी असणारा त्यांचा हसतमुख फोटो बघितल्यावर द्विगुणीत होतो.

आज इंटरनेटवर कुठेही गुगल वा अन्य सर्च इंजिनवर किंवा फेसबुक, ओरकुटवर त्यांच्या एवढे चाहते, एवढ्या लिंक्स आणि त्यांच्या विषयी एवढी माहिती मिळते की दुसऱ्या कुठल्याही लेखकाची एवढी माहिती मिळणे केवळ अशक्य. त्यांच्यावर कितीतरी ब्लॉग, कितीतरी कम्युनिटीज इंटरनेटवर बनलेले आहेत, त्यात त्यांच्याविषयी रोज चर्चा होत असते , विचारांची देवाणघेवाण होत असते.

अशा असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या या लेखकाचा मोह देवालाही पडावा यात नवल ते काय ! म्हणून देवाने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. सुशिंच्या दुनियादारीमधलंच हे शिरीनच वाक्य आहे कि "जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते पण तिची वेळ चुकीची असते". मला वाटतं माझ्याही बाबतीत तेच झालं असावं. जेव्हा सुशि होते तेव्हा ते मला कळले नाहीत, आणि जेव्हा ते मला कळले तेव्हा ते या जगात नव्हते. गोष्ट मला मिळाली होती पण वेळ चुकीची होती. सुशिंना मी भेटू शकलो नाही यासारखी दुःखाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नसेल. शेवटी एक गोष्ट निश्चित अगदी काळ्या दगडावरच्या रेषेसारखी, मी कायम सुशिवेडा राहील आणि माझ्या घरातले सगळेच त्यांचे चाहते बनतील असा माझा प्रयत्न असेल. आमच्या पुढील पिढ्याही त्यांचे चाहते असतील आणि त्यासाठीच त्यांची सर्व पुस्तके जमा करून मी घरामध्ये ठेवली आहेत, म्हणजे ती शेवटपर्यंत आमच्या घरातील प्रत्येकजण वाचत राहील. आज सुशि आपल्यात नसले तरी ते आमच्या मनात सदैव आहेत, आणि कायम राहतील. जेव्हा आम्हाला एकाकी वाटते, मन दुखी होते, या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा येतो तेव्हा त्यांची पुस्तके आम्हाला जगण्याची आशा देतात. त्यांची पुस्तके अमर आहेत. ती या जगाच्या शेवटापर्यंत वाचकांना वाचनाचे सुख देणार आहेत.


शेकडो वर्षानंतर असा लेखक जन्माला येतो 
या थोर लेखकाला शतश: प्रणाम   !!! 


सु.शि. बद्दल मला इथे म्हणावेसे वाटते की
“ झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु परंतु या सम हा “

सु.शि. तुम्ही आम्हाला सोडून गेलात जर आज तुम्ही असता……… एकदा तरी तुम्हाला भेटायला हवं होतं हि खंत आता आयुष्यभर राहील.