Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

सुशिंविषयी अनेकांनी मांडलेल्या प्रतिक्रिया

महेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :

अचानक एक नविन वादळ आलं सुहास शिरवळकर नावाचं.. एक पुस्तक होतं, दुनियादारी .. मला वाटतं मी ते पुस्तक २००१ मधे वाचलंय.. अन खरं सांगतो. .. त्या पुस्तकाने अक्षरशः मनातुन हादरलॊ होतो. सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातल्यासारखे. मग तो श्रेयस असो किंवा दिग्या.. ह्या पुस्तकामुळे वाचनाची “चव” बदलली. अन झपाटल्या सारखी सुहासची सगळी पुस्तकं वाचुन काढली. या पुस्तकामधे अगदी कट्टा ते मारामाऱ्या सगळं काही होतं . ते दारु पिणे जे आजकालचा लपुन छपुन करतो ते अगदी कथानकाच्या ओघात आलेले आहे आणि कुठेही मुद्दाम जोडले आहेत असे वाटत नाही. सोबत शिवराळ भाषा पण येते . शिव्या वाचतांना आपण काहितरी वेगळं ,अडखळल्यासारखं किंवा विचित्र वाचतोय असं वाटंत नाही. सगळे शब्द वाक्यामधे अगदी चपखल बसले असतात. . तरुणांच्या रोजच्या बोलण्यातली भाषा वापरल्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपल्या समोरच घडताहेत असे वाटते. श्रेयस च्या जागी आपणच आहोत अन दिग्या पण आपलाच एक मित्र आहे अन सगळं कथानक आपल्या भोवतीच घडतंय असं फिलिंग येतं….दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणुन जर वाचायला वेळ असेल तेंव्हाच हे पुस्तक उघडा…पुस्तक वाचुन झाल्यानंतर मात्र एक सुन्न करणारा अनुभव येतो.. कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे हे.. ’दुनियादारी’ला …हे पुस्तक वाचल्याशिवाय कॉलेज लाइफ सुरु करुच नये असे मला वाटते. तसेच प्रत्येक पालकानेही हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांनाही तरुणांच्या दुनियेचा अंदाज येणार नाही.जरी आज कॉलेजात जाणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचलं तरी त्यांना असं वाटेल की सगळ्या घटना अगदी आपल्या सभोवतालीच घडत आहेत असे वाटेल.. आणि हेच त्या पुस्तकाच्या यशाचे रहस्य आहे. अहो बघा ना, २५ वर्षांपुर्वी लिहिलेलं पुस्तक अजुनही वाचतांना ताजं तवानं वाटतंय.


या कादंबरीतून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे,माणसाने निर्व्यसनी असावे,सभ्य असावे (सभ्यतेचा बुरखा पांघरुन मिरवलेला सभ्यपणा नाही तर बोलण्या बागण्यात,कॄतीत असलेला सभ्यपणा), माणसाला आयुष्यात ध्येय असावे आणि ते मिळवण्यासाठी निवांत पणे चालतांना आयुष्याच्या प्रवासाचा आनंदही माणसाने घ्यावा,भूतकाळातील प्रेमासाठी झुरण्यापेक्षा जोडीदारावर नि:स्सीम प्रेम करुन त्याला मनापासून साथ देऊन खरे प्रेम करावे.

संदिप चित्रे यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया : 
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!



राजे यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :
दुनियादारी कुठून सुरु व कुठून समाप्त हे कळतच नाही हे वास्तव आहे, कुठल्याही पात्राच्या जागी तुम्ही स्वताला पहाणे हे यश आहे ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे. भन्नाट वेग व एकापेक्षा एक सरस व्यक्ती हेच ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे यशाचे कारण. कोण कुठले श्रेयस , डिएसपी, अशोक, एम के, श्री, नितीन, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन , मिस्टर व मिसेस तळवळकर, कोण अशोकची आई व कोण दिन्याची फॆमेली, कोण जाणे कुठले एसपी कॊलेज पण आपण वाचनाता अचानक गुरफटले जातो व वाटते अरे आम्ही तर ह्यांना ओळखतो जर जवळून नसेल तर दुरुन सही पण आम्ही ओळखतो सर्वांना, पुस्तक वाचण्याआधी व वाचल्यानंतर आपले भावविश्व एकदम वेगळे होऊन जाते, आपण का जाणे अचानक एका वेगळ्याच विश्वामध्ये रमतो, जो आपल्याला नेहमी खटकत असतो जिवनामध्ये तो पण आपलासा वाटू लागतो त्याचा चुकीचा दृष्टीकोन देखील आपण जरा तपासून पाहू लागतो., मित्र, कॊलेज, मारामा-या व तो संतोष बार पाहिला नाही असे नाही कुठे ही जा कोल्हापुरात, पुण्यात अथवा अस्सल दिल्ली मध्ये नाहीतर कानपुरमध्ये सर्वत्र हेच मग ह्या पुस्तकात असे काय आहे ज्याने मला वेड लावले तर ते आहे प्रत्येक व्यक्तीरेखेचे भावविश्व.अरे वाचताना हदयावर खड्डे पडतात यार हेच यश. चार पानं हसण्याची तर चार पानं निरंतर अश्रु ढाळण्याची, माझ्या मित्रांनी मला कधी एवढे इमोशनल पाहिले नव्हते ते जरा चरकलेच पण हा एक पुस्तक इफेक्ट आहे हे कळाल्यावर चार शिव्या देऊन गप्प झाले पण मी गप्प होऊ शकलो नाही, डोक्यात कुणाला दोष द्यावा हाच विचार चालू होता व आहे. श्रेयस तळवळकर, हा तुम्हाला कुठे ही भेटेल अगदी तुमच्या जवळपास वावरत असेल, नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर / रुम वर पडिक, मित्रांमध्ये रमलेला, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा पण काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला. मीनू एक नजर काफी, आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी अशी मिनू तुम्ही देखील कधी ना कधी पाहिलेली, अंगात रग असलेला पण रस्ता माहीत नसलेला, मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि एस पी देखील तुम्हाला कोप-या कोप-यावर भेटेल, मित्रांना नेहमी हसवणारे / प्रत्येक वेळी साथ देणारे नितीन, मध्या व श्री देखील भेटतील, तसेच मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे प्राणी देखील आपल्या आसपास भेटतीलच. कुठल्याही बार वर जा तुम्हाला एम के जरुर भेटेल जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम. नातेगोती कधी अश्या क्षणाला पोहचली की जेथे तोंड दाखवायला जागा राहिली नाही की मनमोकळेपणा अशी अनेक जोडपी आपलाला आसपास दिसतील. ह्या पुस्तकात आहे तरी काय ? ह्या ३१५ पानी पुस्तकात एक कॊलेज आहे, एक कट्टा आहे, काही मित्र आहेत काही मैत्रीणी आहेत, आई-वडील आहेत एक एमके आहे व एक त्याची कोणीच नसलेली पण सर्व काही असलेली स्त्री आहे, प्रेमाच्या अथांग सागराला कसा वळसा देणे आहे हे माहीत असलेली शिरिन आहे तर नात्यांना किती किंमत द्यावी हे माहीत असलेला तीचा भाऊ आहे, प्रेम म्हणजे एक दरी आहे व दरीच्या काठावर उभे असलेले सुर्यास्त व सुर्योदय निहारत असलेले जोडपे आहे तर प्रेम म्हणजे काय माहीत नसलेली व एका मुर्खाशी लग्न करायला एका पायावर तयार असलेली प्रियसी देखील आपल्याला भेटते. प्रत्येक जण वेगळा पण एकमेकाशी जुडलेला ह्या ना त्या कारणाने. लहानपणापासून आई-वडिलांच्यापासून दुरावलेला एक मुलगा, वडिलांच्या इच्छे खातिर लग्न केलेली व प्रेमाचा बळी देलेली आई, बायको दुस-यावर प्रेम करते हे माहीत असून देखील लग्न केले व लग्न टिकवण्याचा व नाते जपण्याचा निरंतर प्रयत्न करणारा पती, पतीने धोका दिला म्हणून विचित्र अवस्थेत प्रियेसी, स्वत:ला प्रियतमे ने सोडला म्हणुन निराशेच्या गर्तेत डुबक्या मारणारा एम के, एक गावगुंड पण मनात दोस्तीचा दर्या असलेला व मनाने हळवा डिएसपी व त्यांचा अफाट मित्रसंग्रह.

मनोज यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :
"सु.शि." म्हणजेच सुहास शिरवळकर. कित्येक तरुण वाचकांचे एक आदर्शवादी लेखक. कारण ऐन तारुण्याच्या उंबरठयावर पाऊल ठेवणा-या प्रत्येक तरुणाला वास्तववादि "दुनियादारी" ला सामोरे जावे लागत असते आणि त्या उंबरठयावर असतांना काहि तरूणांना आयुष्यभराच्या वाटचालीसाठी योग्य वाट सापडते तर काहि हिच वाट चुकतात आणि कुठेतरी दुरवर भटकत जातात. याच वयात कॉलेज जिवनात लागणा-या वाईट संगती आणि सोबत, कुणाबद्दल तरी मनात वाटणारं आकर्षण किंवा प्रेमही खुलत असतं. अशा या प्रत्येक तरूण मनाच्या आयुष्यात येणा-या एका पर्वाला सु.शिं.नी आपल्या "दुनियादारी" या कादंबरीतुन इतक्या बखुबीपणे मांडले आहे की, त्याबद्दल कितीही बोलले तरी शब्द तोकडे पडतात. हा माझा स्वानुभव आहे की, दुनियादारीची थोडिशी कल्पना कुणाला दिली तर ऐकणा-याच्या मनात त्यासंबंधी प्रचंड कुतुहल व त्याचसोबत कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्यानंतर सुरु होतो दुनियादारीचा शोध. प्रातिनिधीक स्वरुपातल्या कादंबरीचा अथवा वास्तवातल्या दुनियादारीचा. प्रत्येक मुलाच्या वा मुलीच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रीणी येत असतात. परंतु त्यांची व्याप्ती किती..? असे विचारले तर ते मात्र चटकन कुणाला काही ठरविता येत नाही. अशाच प्रकारे या कादंबरीतुन अजरामर झालेला एस.पी. चा कट्टा आणि त्या कट्ट्यावरची वरकरणी टवाळ दिसत असणारी " कट्टा गँग" मनातून किती प्रेमळ आणि मवाळ आहे याचं दर्शन घडते.या कट्टयाचे सदस्य- दिग्या (डि.एस.पी), श्रेयस, अश्क्या, उन्म्या, नित्या, मध्या, श्री, प्रितम पटेल.मुली- शिरीन, मिनू, सुरेखा, आशा, पुष्पा.विरोधी पण महत्वाचे- साईनाथ, शशिकला. आणि या व्यतिरिक्त- एम.के.क्षोत्री, रानी मां, डॅडी, धिरुभाई.सर्वच पात्रे कशी आपल्या सभोवताली सापडणारी आहेत. त्यामुळे ही दुनियादारी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. हे सारे कसे एकसंध आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देणार असे गृहितक मांडुन चाललेले."शोधा म्हणजे सापडेल" अशी एक उक्ति आहे... त्याप्रमाणे थोडया वेगळ्या स्वरूपात बोलायचे झाले तर मी म्हणेल, " पहा म्हणजे सापडेल" आपल्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्ति मधे ही पात्रे इतकी सहजपणे सापडतात... की क्षणभर तुम्हाला स्वत:ला वाटते, आपण पण ही दुनियादारीच तर जगत नाही आहोत ना....! "शिरीन" या अनुभवसंपन्न मुलीबद्दल काय बोलावे..? कादंबरीचा हर एक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही... तिचे एक वाक्य मनाला खुपच लवकर भिडते. ती म्हणते," आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते." या वाक्यातला खोलवर असलेला विचार शिरीनच्या मुखातून निघालेला असला तरी तो मुळात सु.शिं.च्या ह्रदयातुन आलेला आहे, हे विसरुन कसं चालेल...!एम.कें.चं जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं ते दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलणं... रानी मां म्हणजेच पुर्वीच्या मीरा सरदेसाईचं दु:ख... हे सारं मनातुन काढुन कागदावर उतरविणारे आपले सु.शि.दुनियादारीचं सार काढुन ती कोळुन प्यायल्यास क्वचित प्रसंगी आयुष्य जगतांना कुणाला काही त्रास होईल असे मला वाटते. अन्यथा या विचारांच्या आधारे स्वत:चं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करुन घेण्यास प्रत्येक वाचकाला मदत होते.तेव्हा अशी ही दुनियादारी प्रत्येकाने जपा, जगा. हीच एक अपेक्षा...

मित्रांनो,
"दुनियादारी" दुनियादारी...रानी मां मधील गुढ एका आईची, डॅडिंनी वाळीत टाकलेल्या मुलाच्या नात्याची...
दुनियादारी...मिनू की शिरीन...? या पडलेल्या कोड्याची, मोठा होऊन सुध्दा"चाईल्ड" असणा-या श्रेयसची...
दुनियादारी...चाकु, तलवारी, राडा हे सारं सारं विसरुन,प्रेमात, रांगड्या वाघाचं मांजर झालेल्या दिग्याची...
दुनियादारी...एका टोणग्यावर मनसोक्त प्रेम करणा-या,अण्णांच्या धाकामुळे स्वप्न चुरगळणा-या सुरेखाची...
दुनियादारी...भित्रा, घाबरट दगाबाज अशा अश्क्याची, अनुभव कोळुन प्यायलेल्या प्रितम अन शिरीनची...
दुनियादारी...मध्या, श्री, नित्याया सा-यांच्या दोस्तीची, हुशार अन हजरजबाबी विनोदी कोडे घालणा-या उन्म्याची...
दुनियादारी...संधी मिळताच गेम करणा-या संधीसाधु साईनाथची, वासनेपोटी माजलेल्या गंडविणा-या शशीकलेची...
दुनियादारी...लग्न म्हणजे पोरखेळ समजणा-या मनीषची, तर कॉलेजात शिकतांना मास्तरवरच प्रेम करणा-या सुधेची...
दुनियादारी...दु:ख दारुत बुडवून तशीच पोटात रिचविणा-या, भावनाशुन्य झालेल्या महान अशा एक.के.क्षोत्रींची...
दुनियादारी...वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत राहणारी, सर्वांची आवडती कधीही न संपनारी...तुमची, आमची ...दुनियादारी...दुनियादारी...दुनियादारी...
---------------------------------------------------------------------------------------
मी पण असाच आहे फाटका
एमके माझ्यामध्ये देखील वेगळा
कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा
तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला
कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ
तर कधी दारुमुळे झालेली आबाळ
मी असाच एक श्रेयस
दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता
अचानक दुनियादारी शिकलेला
हरवलेल्या मित्रांमध्ये कधी
श्री तर कधी नितीन शोधत असलेला
संतोष बार च्या अंधा-या टेबलवर
दुनियादारीचा हिशोब मांडलेलामीच तो एम के कधीश्रेयस असलेला ! 

7 comments:

  1. मित्रानो मला प्लीज शुशी चा फोन नंबर द्या

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार, सुशिंचा घरचा नंबर - ०२० - २४४५३६११

      Delete
  2. मित्रानो मला प्लीज शुशी चा फोन नंबर द्या

    ReplyDelete
  3. नमस्कार बिपीन, दुर्दैवाने सुशि आज आपल्यात नाहीत. त्यांच्या पुण्याच्या घरचा नंबर तुम्हाला मिळेल, जिथे त्यांच्या पत्नी म्हणजे सुगंधा काकू राहतात.

    ReplyDelete
    Replies
    1. सुशिंचा घरचा नंबर - ०२० - २४४५३६११

      Delete
  4. नमस्कार, कोणी मला फिरोझ इराणी , मंदार पटवर्धन, अमर विश्वास आणि दारा बुलंद या त्यांच्या मानस पुत्रांच्या पुस्तकांची नावे देऊ शकेल का? मला ती सर्व पुस्तके विकत घ्यायची आहेत.

    कृपया कोणी तरी मदत करा

    ReplyDelete
  5. मंदार कथा - गोल्डहेवन, ऑपरेशन बुलेट, सफाई, तो, हिरवी नजर, भयानक, काळे युग, अफलातून, शैताली, किंकाळी, नकार, खुनी पाऊस, चक्रव्यूह, सौदागर, डाउन लेव्हल, आवारा, टॉवर हाऊस

    दारा बुलंद कथा - सन्नाटा, आक्रोश, लास्ट बुलेट, इज्जत, अवाढव्य, पोलादी, भन्नाट, खजिना, झंझावाती, कलंक, गिधाड, असहा, शोला, कट्टर, वॉन्टेड, जिव्हारी

    अमर विश्वास कथा - थर्राट, चेलेंज, कायद्याचे हात, सराईत, मर्डर हाऊस, कोल्ड ब्लड , ऑर्डर ऑर्डर, टेरिफिक, इलेवंथ अवर, सायलेन्स प्लीज, नॉट गिल्टी, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, स्टार हन्टर्स, सराईत

    फिरोज इराणी कथा : सहज, ट्रेलर गर्ल, गाफील, डेड शॉट, हव्यास, पांचाली, ब्लाक कोब्रा, जबरदस्त, सॉलीड, शैली शैली, उस्ताद

    मुक्त / विस्मय कथा : हेलो हेलो, गुणगुण, माध्यम, जाणीव, किलक्रेझी, मरणोतर, निराकार, मास्टर प्लॅन, जीवघेणा, सैतानघर, अनुभव, स्टुपिड, ज्वाला, मातम, अट्टल, प्राक्तन, मंत्रजागर, ज्वेल थीफ

    ReplyDelete