शिं
णं
_________________________________________________________________________________
सुशिंचे अनुभव खास सुशिंच्या शब्दांत सुशिंनी सांगितले आहेत ते त्यांच्या इत्यादी इत्यादी या पुस्तकात.
यातील " मॄत्यूनंतरचा मित्र " या लेखात त्यांनी त्यांचा खालील अनुभव सांगितला आहे.
ते सांगतात,
"एका एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस समारंभानिमित्ताने खेडला (रत्नागिरी) गेलो होतो. प्रिन्सिपल विनायक वैद्य, माजी नगराध्यक्ष बाबा पाटणे ... अशा बडया-बडयांच्या सहवासातही, उत्तम जैन हा तरुण त्यांच्याइकाच जवळचा झाला होता. दुस-या दिवशी उत्तम एका तरूणाला घेऊन माझ्याकडे आला. ओळख वगैरे करुन दिली. तो तरूण खास ’सुशिं’ ना भेटायला मिळणार म्हणून अंतर्भागातून कुठूनतरी, अडचणींवर मात करीत, खेडपर्यंत आला होता ! त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या. त्यात असं लक्षात आलं की, या तरुणाला कुठला तरी असाध्य आजार आहे आणि त्याला जगण्याची मुळीच आशा नाही ! ‘आजारा’बद्द्ल बोलायला तो मुळीच उत्सुक नव्ह्ता. मी पण खोलात शिरलो नाही. त्याच्या नैराश्यातूनच मला तो जाणवत होता. म्हणून मी त्याला धीर दिला. जीवनाकडे पाठ फिरवण्यापेक्षा जीवनाभिमुख हो... खुप काही बोललो असेन. माझ्या शब्दांपेक्षा त्या वेळी त्याच्या चेह-यावर जे समाधान होतं, ते मला आता अस्वस्थ करतं !
मी पुण्याला परत जाताना उत्तमने मला आवर्जून सांगितलं – ‘सुशि, त्याला एक पत्र लिहा. तुम्ही त्याचे फार आवडते लेखक आहात. त्याला फार फार बरं वाटेल.’
गडबडीत, पत्यांशी देवाण-घेवाण राहिली होती. म्हणून पुण्याला आल्यावर उत्तमला पत्र लिहिलं, त्याच पाकिटात त्याचंही पत्र टाकलं. नंतर, माझा प्रवास ... लेखन ... दौरे.
उत्तमची अधून-मधून पत्रं. एकाचा आवर्जून उल्लेख - ’तुमच्या पत्राने त्याला उभारी आलीयं. जगायचं म्हणतो... वगैरे. त्याचं त्या वेळी पत्र आलं का नाही... नसावं बहुतेक !
हळूहळू, संदर्भ विस्कळीत झाले. ’खेड’ चीही पत्रं मंदावली.
आणि अचानक, मध्येच केव्हातरी, एकदा उत्तमचं पत्र आलं.
सु.शि... तुम्हाला माझा ’तो’ मित्र आठवातो का ? तुम्ही त्याला पत्रही लिहिलं होतं !
गेला ! त्याला कॅन्सर होता, आणि तुम्ही भेटलात तेव्हाच तो आटोक्याबाहेर गेला होता !
कॅन्सर ? आणि या मुलाला मी जीवनाभिमुख वगैरे व्हायला सांगत होतो ! मग त्या वेळी त्याच्या चेह-यावर जे समाधान विलसत होतं, ते कसलं ?
उत्तमच्या पत्रात, पुढे या प्रश्नाचं उत्तर होतं !
सु.शि. तुम्ही भेटलात, त्या तारखेला त्याच्या रोजनिशीत नोंद आहे :
"आज सु.शि. भेटले. आवडत्या लेखकाला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांनी मैत्रीसाठी हात पुढे केलाय. पण तो स्वीकारायला माझं आयुष्य तोकडं आहे ! किती दिवस निभावू शकेन मी ही मैत्री ? मी तेवढा भाग्यवान आहे का ?"
त्याची ती नोंद खपकन हॄदयात घुसण्यासाठी, त्याच्या नावाची गरज नव्हती... रुप आठवण्याची गरज नव्हती.
अरे, कॅन्सरग्रस्त असा एक तरुण आपल्याला इतका जिवलग मित्र मानत होता आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसावी ? हा तरूण आपल्या खिजगणतीतही नसावा ?
लेखक म्हणून काय ? माणूस म्हणूनही माझी मला लाज वाटली !
उत्तमचं पत्र इथे संपत नव्हतं. ’तो’ स्म्रॄतिपटलावर निनावीपणे अमर होण्यासाठी, आणखी एका हुकमी वाराची झेल मला कळवळत ... विदीर्ण होत, स्वीकारायची होती !
’त्या’ च्या संदर्भातली उत्तमची शेवटची नोंद होती -
सु.शि. .... ’तो’ गेल्याचं फोनवरून कळलं. मी अर्ध्या-पाऊण तासात तिथं पोचलो. पाहतो, तर माझा आणि तुमचा मित्र झोप लागल्यासारखा शांतपणे पलंगावर पडला होता. आणि ... विश्वास ठेवा, सु.शि. - त्याच्या छातीवरलं पुस्तक त्यानं मॄत्यूनंतरही दोन्ही हातांनी गच्च पकडून ठेवलेलं होतं ! ते तुमचं होतं !’
एका भेटीत मी ’त्या’ला असं काय दिलं होतं, हा प्रश्न मला पडत नाही. ’माणूस ’सु.शि. च्या आधीपासूनच त्याची ’लेखक’ सु.शि. शी मैत्री होती. पण जिवंत असताना नोंद घेतली गेली नाही. मॄत्यूनंतर मला जिवलग मित्र गेल्याचं अमर्याद दु:ख कायमसाठी देणा-या मोजक्या ओळखींमध्ये ‘तो’ येऊन बसला, हे खरं !
मित्रांनो, ‘त्या’ सुशिचाहत्या, सुशिवेडया, सुशिभक्ताला लाखो सलाम !!!
________________________________________________________________________________
सुशिंचे अनुभव खास सुशिंच्या शब्दांत सुशिंनी सांगितले आहेत ते त्यांच्या इत्यादी इत्यादी या पुस्तकात.
यातील " गावठी नशिबाचं " या लेखात त्यांनी त्यांचा खालील अनुभव सांगितला आहे. सुशिंनी अनुभवलेला हा अनुभव अनेकांनी कितीतरी वेळा अनुभवला असेल. 'त्या' कुत्र्याच्याबाबतीत आपणही बराच वेळा असा अनुभव घेतला असेल. आपल्यालाही त्याचे वाईट वाटले असेल. पण सुशिंनी ती गोष्ट त्यांच्या सुम्क्ष निरीक्षणशक्तीने इतकी अप्रतिमपणे मांडली आहे की, कथेच्या शेवटी शेवटी वाचताना आपल्याही डोळ्यांत पाणी तरळते. हा एक साधा, प्रत्येकाच्याच बाबतीत घडणारा अनुभव, पण सुशिंनी आपल्या लेखणीने तो इतका जिवंत केलाय की ते फक्त सुशिच करू शकतात.
लेखक जळगावहून पुण्याला येत आहेत. वाटेत एका थांब्यावर जेवणासाठी बस थांबते आहे. पाहुयात सुशिंनि काय अनुभव घेतला त्या ठिकाणी.
ते म्हणतात -
निरुद्देशपणे एका बाजुला उभं राहून, पान - टपरीवरची कर्कश्श गाणी ऐकत, पान-सिगारेटवाल्यांच्या स्टाईलस पाहत, बरा वेळ जाऊ लागला.
मध्येच, कशा करतातरी म्हणून पाय उचलू लागलो, तर लक्षात आलं - डावा पाय आपल्याला सहजपणे हालवता येत नाहीये - जड वाटतोय ! प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून पायाकडे पाहिलं तर -
अलेलेलेलेलेs! कुत्र्याचं एक अख्खं पिल्लू बुटावर मावलेलं आणि रंगात येऊन बुट खाण्याच्या प्रयत्नात.
कुत्री-मांजरं-भिकारी-वेडे... यांना माझंच इतकं आकर्षण का, काही कळत नाही ! पण ऐन गर्दीतही ही यादी मला हुडकून काढते, खरं !
तीन बसेसमधली शंभरएक माणसं आपल्याला चपला-बुटांसह तिथे वावरतायत; पण या पिल्लाला दुसरा बुट दिसला नाही.
होतं गावठीच, पण बाळसं उतरलेलं नव्हतं. एकदम बनपावासारखं लुसलसशीत...गुट्टु. पुढे रंगही सामान्यच मळकट करडा-तपकिरी झाला असता, पण आता सगळचं कसं विलोभनीय.
तसाच खाली बसलो. हात लावला. उपजत कुत्रेपणानं त्यानं हात चटाचटा चाटला. करंगळीएवढं शेपूट ताठ करुन हालवत, माझ्याकडे पाहिलं तोंडाने ’कूँ-कूँ' केलं. आणि भुक लागली होती म्हणून, की तो खेळ वाटला-आव्हान वाटलं म्हणून, त्यानं आपल्या निरागस दातांनी माझा पंजा चावायला घेतला.
’ए!’ म्हणत, मी त्याला हळूच टप्पू मारला. बुटावरून खाली ठेवला. तर, ’माझ्या जागेवरून तू कोण हुसकणार ?’ असं गुरकावत, पठ्ठ्या परत लुडबुडत, धडपडत बुटावर स्वार झाला ! पण यावेळी त्यानं हात चावला नाही.
अरे ! बिस्किटांचा पु डा!
काढला. फोडला. एक बिस्किट त्याच्या तोंडात दिलं.
नाही हो, बिस्किट खाणं ही कल्पनादेखील त्याला नवी होती !
त्याला ते पकडतादेखील येत नव्हतं. चावून खाणं, दूरच! मातीत टाकून येडं, ’आता या तुकडयाशी कसं खेळावं ?’ असे पवित्रे घेत बिस्किटाभोवती फिरायला लागलं. पंजे मारू लागलं !
बिस्किट उचललं. एक तुकडा तोडून हातावर उभा ठेवला.
लगेच त्यानं पुढचे पंजे हातावर ठेवले. तुकडा चावला.
चव कळली. उपयोग समजला. तरारत त्यानं ’हल्ला बोल!’ आवेश धारण केला. पण तुकडा तोडून, तो चघळतानाही त्याला कोण कष्ट पडत होते! दमत होता. थांबत होता. देणा-याचा विचार बदलण्यापूर्वी हे संपवलं पाहिजे - अशा अभिनिवेशात पुन्हा बिस्किटावर तुटून पडत होता.
छे! काय सालं नशीब या कुत्र्याचं !
शहरातल्या कुठल्या वस्तीत जन्माला आला असता, तर कदाचित, कोणीतरी त्याला पाळलं असतं. ’‘टाँमी’, ’टायगर’, ’सनी’ अशा कोणत्याही हाकेला त्यानंही प्रतिसाद दिला असता. घरातली माणसं त्याला कळली असती. बाहेरच्या माणसांवर भुंकून, त्यानं घरातल्या माणसांना सावध केलं असतं. त्याची बुध्दी आणखी तीक्ष्ण असेल, तर वर्तमानपत्रवाल्याने दिलेलं वॄत्तपत्र तोंडात धरून त्यानं मालकाला आणून दिलं असतं. भाग्य असेल तर, मालकाच्या कारच्या मागच्या सीटवर बसून, त्यानं खिडकीतून बाहेर पाहत रहदारी न्याहाळली असती !
यातलं काहीच नाही! या जन्मी तरी नाही.
कोणाच्या तरी पायात घुटमळलं, लोचट लगट केली, तर पोटाला मिळतं... हा याचा पहिला धडा कदाचित मीच त्याला शिकवलेला! आता, याच मार्गाने तो आपलं पोट भरत राहील. मार आणि पदार्थ खाता खाता, माणसं ओळखायला शिकेल. दुस-या कुत्र्यानं आपला वाटा पळवू नये, म्हणून आक्रमक होइल. मारामारी करताना, त्वेषानं चावेल, चावून घेईल! कोणी त्याला खायला घालेल, कोणी ’हाsड’ करेल, तरी तो वाचेल. वाढेल, मोठा होईल.
का ? कशाकरता ? त्याच्या जन्माला येण्याचा उद्देशच काय? जन्मभरच्या कष्टाचं फलित काय ?
दिवसा.. रात्री... तो निरूद्देशपणे रस्ते ओलांडेल. रस्ता ओलांडताना शिताफीनं वाहनं चुकवेल आणि ... आणि...
एखाद्या अंधाऱ्या रात्री त्याची शिताफी कमी पडली, की एक बस, एक ट्रक असं कोणतंही वाहन त्याची आयुष्यरेषा चिंधडून निघून जाईल! त्यासाठी कदाचित हा मोठा होण्याचीही वेळ येणार नाही! ज्या विश्वासानं हा वेडा माझ्या बुटावर बसला, त्याच विश्वासानं बसच्या चाकाला बिलगून बसला, आणि कोणाच्या लक्षात आलं नाही, तरी संपेल सगळं!बिस्किटाचा शेवटचा कण संपेपर्यंत मी त्याला भरवत होतो आणि पुढच्या जळगाव ट्रिपच्या या थांब्यावर हा पुन्हा माझ्या बुटावर येऊन बसायला असणार नाही! हे पहिलं, अन शेवटचं ! या कल्पनेनं माझे डोळे भरून येत होते.
No comments:
Post a Comment